भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज के. पुरोहित यांचे मुंबईत निधन… राज्याच्या राजकारणात आणि संघटनात्मक कार्यात त्यांचे योगदान अतुलनीय – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज के. पुरोहित यांचे मुंबईत निधन झाले . मुंबादेवी मतदारसंघाचे पाच वेळा आमदार राहिलेल्या पुरोहित यांनी काल रात्री बॉम्बे हॉस्पिटलमध्ये वयाच्या ६९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गिरगाव, काळबादेवी आणि मुंबादेवी परिसरातील स्थानिक प्रश्नांवर त्यांची मोठी पकड होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.
पाटील यांनी म्हटले कि, महाराष्ट्र सरकारचे माजी मंत्री आणि मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष, माजी आमदार राज पुरोहितजी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मन पिळवटून टाकणारे आहे. राज्याच्या राजकारणात आणि संघटनात्मक कार्यात त्यांचे योगदान अतुलनीय आहे आणि ते नेहमीच लक्षात राहील. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती प्रदान करो आणि त्यांच्या शोकाकुल परिवाराला, स्नेहीजनांना तसेच समर्थकांना या अफाट दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना, असे पाटील यांनी म्हटले.
राज के. पुरोहित हे मुंबईच्या राजकारणातील एक मोठे नाव होते. त्यांचा मुंबईच्या राजकारणात मोठा दबदबा होता. दक्षिण मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले होते. केवळ लोकप्रतिनिधी म्हणूनच नव्हे, तर संघटक म्हणूनही त्यांनी मोलाची भूमिका बजावली. मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाचा विस्तार केला होता. तसेच मुंबईत भाजप कार्यकर्ते वाढवण्यात मोठे योगदान दिले. त्यांच्यावर कामगार, दुग्धविकास आणि संसदीय कार्य मंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. तसंच नंतर गृहनिर्माण मंत्री म्हणूनही त्यांनी मुंबईतील भाडेकरूंसाठी महत्त्वपूर्ण काम केले.