सांगलीत जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल… मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकारी आणि आमदारांची बैठक संपन्न
सांगली : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगली ग्रामीणमधील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी माजी मंत्री आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, संघटन मंत्री मकरंद देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी अध्यक्ष दीपकबाबा शिंदे, पृथ्वीराजबाबा देशमुख, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख , शरद लाड , राहूल महाडिक तसेच सत्यजित देशमुख, वैभव पाटील, चिमण डांगे, शेखर इनामदार, राजाराम गरुड, डॉ. आरळी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी उमेदवार निवड, तसेच घटक पक्षांसोबतच्या युती व समन्वयाबाबत सखोल आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकांसाठी सक्षम आणि जनसंपर्क असलेल्या उमेदवारांच्या निवडीबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. महायुतीमधील घटक पक्षांसोबतची युती, जागावाटप आणि निवडणुकीदरम्यानचा समन्वय यावर बैठकीत विचारमंथन करण्यात आले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.