महाराष्ट्र उच्च शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांती; ‘SIRF’ आणि ‘SHEDMS’ प्रणालींसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वाचा करार
पुणे : महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमी, पुणे येथे आज महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग (MHTED) आणि इन्फ्लिबनेट केंद्र, गांधीनगर (INFLIBNET) यांच्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या सामंजस्य कराराअंतर्गत राज्य संस्थात्मक क्रमवारी प्रणाली (SIRF) तसेच राज्य उच्च शिक्षण माहिती व्यवस्थापन प्रणाली (SHEDMS) या अत्याधुनिक, एकात्मिक व वेब-आधारित प्रणालींची रचना व विकास करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
आता राष्ट्रीय स्तरावरील ‘NIRF’ प्रमाणेच महाराष्ट्राची स्वतःची स्वतंत्र क्रमवारी प्रणाली असेल, जी राज्यातील महाविद्यालयांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करेल. ही एक अत्याधुनिक वेब-आधारित प्रणाली असेल, ज्यामुळे राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्थांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. यामुळे विद्यार्थ्यांना आता कोणत्या महाविद्यालयाचा रँक वर आहे, हे पाहून प्रवेश घेणे सोपे होईल. यामुळे पालकांची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक थांबेल.’SHEDMS’ प्रणालीमुळे कोणत्या महाविद्यालयात किती जागा रिक्त आहेत, याची माहिती रिअल-टाइम उपलब्ध होईल. यामुळे भरती प्रक्रियेतील विलंब कमी होईल. ‘SIRF’ मध्ये प्लेसमेंटला महत्त्व असल्याने, महाविद्यालये आता केवळ पुस्तकी ज्ञानाऐवजी कौशल्याधारित कोर्सेसवर अधिक भर देतील.
या प्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव मा. श्री. वेणुगोपाल रेड्डी, इन्फ्लिबनेट (INFLIBNET) च्या संचालिका प्रा. डॉ. देविका मदल्ली, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह राज्यातील विविध विद्यापीठांचे मान्यवर कुलगुरू व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.