सांगलीत ‘स्वाभिमानी’ला मोठे खिंडार; जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
सांगली : सांगली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
सर्व नव्याने प्रवेश केलेल्या मान्यवरांचे पाटील यांनी पक्षात मनःपूर्वक स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अधिक सक्षमपणे कार्य होईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि खराडे यांचे असंख्य समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.