अष्टविनायक, ढोलपथक आणि मूर्तिकार! महाराष्ट्राच्या चित्ररथातून घडले ‘आत्मनिर्भर भारता’चे भव्य दर्शन… मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून चित्ररथाचे विशेष कौतुक

15

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने आपल्या अनोख्या संकल्पनांमधून देशवासीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. २०२६ मध्ये गणेशोत्सव, ढोलपथक आणि मूर्तिकार या विषयावर आधारित चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधले. ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाची सजावट करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचं दर्शन घडलं. या चित्ररथावर अष्टविनायकांच्या प्रतिकृती, ढोल वाजवणारी मराठमोळी महिला आणि गणेशाची मूर्ती साकारणारे मूर्तीकार पहायला मिळाले.या अनोख्या चित्ररथाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष कौतुक केले.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणपती बाप्पा यांचे भव्य आणि दिव्य रूप प्रजासत्ताक दिन २०२६ निमित्त नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर साकारलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथातून देशवासीयांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘गणपती म्हणजे आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित या चित्ररथातून लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची गौरवशाली परंपरा प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. अष्टविनायकांचे दिव्य दर्शन, ढोल-ताशांचा जोशपूर्ण निनाद, तसेच लोककला व लोकपरंपरांच्या सादरीकरणातून महाराष्ट्राची भक्ती, एकात्मता आणि सांस्कृतिक वैभव अभिमानाने देशासमोर उलगडले असल्याचे पाटील यांनी म्हटले.

“गणपती बाप्पा मोरया!” या जयघोषात महाराष्ट्राचा हा चित्ररथ केवळ सांस्कृतिक ओळखच नव्हे, तर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अस्मिता, स्वाभिमान आणि राष्ट्राभिमानाचा नवा उत्साह जागवणारा ठरत असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत या मोहिमेला कशी चालना मिळते, याचा संदेश महाराष्ट्राच्या चित्ररथातून देण्यात आला आहे. मूर्तीकार, सजावट यातून मिळणारा रोजगार आणि होणार आर्थिक उलाढाल हा विषय या चित्ररथातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पारंपरिक पोशाखातील महिला ढोल वाजवत गणपती बाप्पाचं स्वागत करतात. यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन या चित्ररथातून नागरिकांना होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.