कोल्हापूरमध्ये राजकीय भूकंप: गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
कोल्हापूर : कोल्हापूर येथे जनता दलाचे माजी आमदार दिवंगत ॲड. श्रीपतराव शिंदे यांची कन्या, गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी व माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह रविवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. स्वातीताई कोरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाल्याने गरीब कल्याण व विकासाचे कार्य अधिक गतीने पुढे जाईल, असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
पाटील म्हणाले, भारतीय जनता पार्टी हा गरीब, वंचित व सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेला कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली अटल पेन्शन योजना, आयुष्यमान भारत योजना यांसारख्या अनेक लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असून, २५ कोटीहून अधिक नागरिकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढण्याचे ऐतिहासिक कार्य करण्यात आले आहे. स्वातीताई कोरी व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ज्या विकासाच्या संकल्पना आहेत. त्या सत्यात उतरवण्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी पक्ष त्यांच्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहील, असा विश्वास यावेळी देण्यात आला.

गेल्या 11 ते 12 वर्षामध्ये देशात व राज्यात बदलल्या सत्ता केंद्रामुळे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामधील सरकार हे अतिशय सक्षमपणे कार्य करत आहे व विकासाच्या दिशेने अधिक वेगाने पुढे जात आहे. गडहिंग्लज तालुक्याच्या विकासासाठी या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेऊन स्वातीताई यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
या प्रसंगी खासदार धनंजय महाडिक, चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, भाजपा प्रदेश नेते महेश जाधव, राहुल चिकोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, तालुका अध्यक्ष प्रीतम कापसे, राजू तारळे यांच्यासह भाजपाचे व स्वातीताईंचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.