विकासाचा वेग वाढवण्यासाठी भाजपला विजयी करा; नेर्लेत चंद्रकांत पाटील यांचे मतदारांना आवाहन
सांगली : सांगली जिल्ह्यातील कासेगाव जिल्हा परिषद गट आणि नेर्ले पंचायत समिती गटाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नेर्ले येथे ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहितकारी योजनांचा पाढा वाचत, त्यांनी मतदारांना भाजपच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले आहे. या विकासाचा लाभ तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असणे आवश्यक आहे. विकासाचा हा प्रवास अधिक गतीने पुढे नेण्यासाठी भाजप उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, भाजपा नेते श्री. चिमणराव डांगे, सतीशकाका माने यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नेर्ले गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.