मावळच्या पहिल्या महिला आमदार रुपलेखाताई ढोरे यांचे निधन; महिलांसाठी दिलेले प्रेरणादायी नेतृत्व आणि जनतेप्रती असलेली त्यांची निष्ठा सदैव स्मरणात राहील – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : मावळ विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार आणि भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती रुपलेखाताई ढोरे यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या जाण्याने मावळ तालुक्यासह संपूर्ण राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुपलेखाताईंच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, मावळच्या पहिल्या महिला आमदार आणि भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती रुपलेखाताई ढोरे यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आणि मन हेलावून टाकणारी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजल. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य, महिलांसाठी दिलेले प्रेरणादायी नेतृत्व आणि जनतेप्रती असलेली त्यांची निष्ठा सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने मावळसह संपूर्ण राजकीय क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती देवो व ढोरे कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.
रुपलेखाताई ढोरे यांनी मावळच्या पहिल्या महिला आमदार म्हणून इतिहास घडवला होता. भाजपच्या संघटन वाढीसाठी आणि तळागाळातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या निधनाने मावळमधील एका ज्येष्ठ आणि मार्गदर्शक नेतृत्वाचा अस्त झाला आहे.