राधानगरीत महायुतीचा झंझावात; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला विकासाचा अजेंडा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राधानगरी तालुक्याचा झंझावाती दौरा केला. राधानगरी गाव, बनाचीवाडी, शिरोली, गुडाळ, कसबा तारळे आणि शिरसे अशा विविध गावांमध्ये त्यांनी भेटीगाठी घेत स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला.
या दौऱ्यादरम्यान मंत्री पाटील यांनी केवळ सरकारी योजनांची माहितीच दिली नाही, तर प्रत्येक गावातील रस्ते, पाणी आणि शेतीशी संबंधित स्थानिक समस्या जाणून घेतल्या. “राधानगरी तालुक्याचा शाश्वत विकास करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून, स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
भेटीदरम्यान ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, आगामी निवडणुकीत भाजपा-महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा ठाम संकल्प व्यक्त केला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे आणि महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील भाजपा महायुतीचे उमेदवार, तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.