शिरोलीत राजकीय व विकासात्मक चर्चा; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली गोविंदराव चौगुले यांची भेट

14

कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज शिरोली (ता. करवीर) येथे छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक गोविंदराव चौगुले यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या भेटीदरम्यान उभय नेत्यांमध्ये तालुक्यातील विविध विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती मंत्री पाटील यांनी यावेळी दिली. विशेषतः शेती आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांवर या संवादात भर देण्यात आला.

याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील हे देखील उपस्थित होते. या सदिच्छा भेटीमुळे शिरोली आणि करवीर तालुक्यातील राजकीय गणितांवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.