पुणे-सोलापूर झेडपी निवडणुकीसाठी भाजप सज्ज! प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला ‘विजय’ मंत्र
पुणे : भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे पुणे व सोलापूर जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सखोल चर्चा करण्यात आली.
तसेच दोन्ही जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या संघटनात्मक कामाचा आढावा घेत विजयासाठी आवश्यक असलेल्या रणनीतीबाबत मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या जोश, तयारी आणि संघटनशक्तीमुळे आगामी निवडणुकांमध्ये निश्चित यश मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
केंद्र आणि राज्यातील एकविचारांच्या सरकारने घेतलेले जनहितकारी निर्णय घराघरांत पोहोचवा, असं यावेळी आवाहन केलं. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनसामान्यांचे जीवनमान उंचावले असून यामुळेच गावगाड्यात मोठ्या ताकदीने कमळ फुलेल, असा विश्वास देखील रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
या बैठकीस प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार भीमराव तापकीर, राहुल कुल तसेच जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.