पुण्याच्या महापौरपदी भाजपकडून मंजूषा नागपुरे यांची निवड; सिंहगड रोडला प्रथमच महापौर पदाचा मान
पुणे : पुण्याच्या महापौरपदी मंजूषा नागपुरे यांची निवड भाजपाने केल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज आज नगरसचिव योगिता भोसले यांच्याकडे दाखल करण्यात येत आहे. दरम्यान 119 एवढे संख्याबळ असणाऱ्या भाजपचाच महापौर होतील हे निश्चित आहे. मंजुषा नागपुरे यांच्या रूपाने सिंहगड रोडला प्रथमच पुण्याच्या महापौर पदाचा मान मिळाला आहे. मंजुषा नागपुरे सलग तिसऱ्यांदा नगरसेवक झाल्या असून यंदाच्या निवडणुकीत त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.मंजूषा नागपुरे या भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका व कडव्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या म्हणून ओळखल्या जातात. महापालिकेच्या कामाचा त्यांना चांगला अनुभव असून स्थायी समितीवर देखील त्यांनी काम केले आहे.
दरम्यान काँग्रेसकडून देखील महापौर पदासाठी अश्विनी लांडगे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून महापौर पदासाठी नवनिर्वाचित सदस्य शीतल सावंत यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे 9 तारखेला होणाऱ्या निवडणूकीनंतर औपचारिक घोषणा करण्यात येईल. महापौर पदाच्या शर्यतीमध्ये असणाऱ्या आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री रंजना टिळेकर व राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या भावजय असणाऱ्या मानसी देशपांडे यांना डावलण्यात आले आहे. भाजप नगरसेविका वर्षा तापकीर यांना मात्र सव्वा वर्षानंतर महापौर पद देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्व राजकीय पक्षांचे बलाबल पाहता नऊ तारखेला औपचारिक पद्धतीने भाजपचा महापौर घोषित करण्यात येईल.
पक्षीय बलाबल भाजप :119, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : 27, काँग्रेस : 15, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 3, शिवसेना (UBT) : 01