आरोग्य सेवेतील ‘मॅनेजमेंट गुरू’ तनुजा देशमुख यांचा शक्ती पुरस्काराने सन्मान; १३ वर्षांत ६५ लाख रुग्णांना दिला आधार!

45

मुंबई : मुंबईसारख्या मायानगरीत जिथे संधी शोधणे कठीण असते, तिथे जोगेश्वरीतील अवघ्या ५६ स्क्वेअर फुटांच्या खोलीत वाढलेल्या एका मुलीने आपल्या जिद्दीच्या जोरावर लाखो रुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण फुलवला आहे. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सौ. तनुजा विकास देशमुख यांना यावर्षीचा प्रतिष्ठित “शक्ती पुरस्कार” जाहीर झाला असून, त्यांच्या संघर्षाची ही गाथा आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

जोगेश्वरीतील बांधरेकर वाडीतील एका अरुंद गल्लीत तनुजा यांचा जन्म झाला. घरात कमालीची गरिबी आणि त्यातच वडील श्री. रमेश सावंत यांची दृष्टी जाणे, हा त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आघात होता. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार असलेल्या त्यांच्या वडिलांनी हार मानली नाही. स्वतः दृष्टीहीन असूनही त्यांनी ‘सक्षम’च्या माध्यमातून दिव्यांगांसाठी देशपातळीवर कार्य केले. वडिलांची हीच समाजसेवेची दृष्टी तनुजा यांच्यासाठी संस्कारांची शिदोरी ठरली.

“वडिलांचे डोळे गेले तरी स्वप्ने स्पष्ट होती,” हे सांगताना तनुजा यांच्या डोळ्यात आजही वडिलांप्रती अभिमान दिसतो. अत्यंत बिकट परिस्थितीतही आईची खंबीर साथ आणि घरातल्या राष्ट्राभिमानामुळे तनुजा यांनी ठरवले की, आपल्या आयुष्यातील अंधार जसा वडिलांनी सेवेने दूर केला, तसेच आपणही जास्तीत जास्त लोकांच्या आयुष्यात आनंद फुलवायचा.

तनुजा यांनी पती विकास देशमुख यांच्या साथीने ‘छत्रपती शिवाजी’ज क्रिएटिव्ह सोल्युशन्स’ या संस्थेची धुरा सांभाळली. अवघ्या ४९ सहकाऱ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज ४१३ तज्ज्ञ आरोग्य सेवकांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचला आहे. यामध्ये २५ हून अधिक डॉक्टर आणि शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही केवळ एक कंपनी नाही, तर ही एक ‘सेवेची सेना’ आहे जी गरिबांसाठी अहोरात्र झटत आहे.

१३ वर्षे, ६५ लाख रुग्ण आणि एकही तक्रार नाही!

तनुजा यांच्या चोख व्यवस्थापनामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्या आहेत:

१००% रुग्ण कव्हरेज आणि १००% क्लेम सेटलमेंट: एकही रुग्ण पैशांअभावी उपचारांपासून वंचित राहिला नाही.

अखंड सेवा: गेल्या १३ वर्षांपासून २४x७ रुग्णसेवा दिली जात आहे.

विक्रमी आकडेवारी: आतापर्यंत ६५ लाख रुग्णांना सेवा दिली असून आजतागायत एकही तक्रार आलेली नाही. हे यश केवळ आकड्यांचे नसून ते नैतिकतेचे आहे.

वडिलांची दृष्टी जाणे, गरिबीचे चटके सोसणे आणि ५६ स्क्वेअर फुटांच्या घरात राहूनही समाजसेवेचा वसा न सोडणे, यांतून तनुजा यांचे व्यक्तिमत्त्व घडले. ‘अभाविप’च्या संस्कारांतून घडलेली ही कार्यकर्ती आज हजारो रुग्णालयांसाठी ‘रोल मॉडेल’ ठरली आहे. यापूर्वी त्यांना चार विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे, मात्र त्यांच्या मते ही तर फक्त सुरुवात आहे.

तनुजा यांच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी जर त्यांच्याच मुखातून ऐकली, तर डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. त्यांचे शब्द मनावर असे संस्कार करतात की, आयुष्यात कोणतीही गोष्ट अशक्य वाटत नाही. हा ‘शक्ती पुरस्कार’ म्हणजे त्यांच्या आई-वडिलांच्या कष्टांना दिलेली दिशा आणि लाखो गरीब रुग्णांच्या डोळ्यातील आशा आहे.

आज तनुजा देशमुख यांनी रुग्णसेवा आणि सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतले आहे. हा ‘शक्ती पुरस्कार’ म्हणजे केवळ त्यांचा गौरव नसून, त्या अरुंद गल्लीतून सुरू झालेल्या एका ध्येयवेड्या प्रवासाचा आणि अश्रूंमधून फुललेल्या धैर्याचा सन्मान आहे. त्यांच्या या यशामुळे जोगेश्वरी परिसरासह संपूर्ण मुंबईतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.