कबनूर-कोरोची गटात महायुतीची वज्रमूठ; विकासाचा वेग वाढवण्यासाठी भाजपला विजयी करा – मंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कबनूर-कोरोची जिल्हा परिषद गट तसेच कबनूर आणि कोरोची पंचायत समिती गणातील भाजपा महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोरोची येथे जाहीर सभेत मतदार बांधवांशी संवाद साधला.
यावेळी संबोधित करताना पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्वपूर्ण योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारने लोककल्याणासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ तालुक्यातील ४८ हजार शेतकऱ्यांना मिळत आहे, तर दोन लाखांहून अधिक लाडक्या बहिणी विविध योजनांमधून सक्षम होत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी केंद्र व राज्यातील महायुती सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध व्हावा, यासाठी भाजपा महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन देखील पाटील यांनी केले.
यावेळी इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे, शिवाजी पाटील, बाबासो चौगुले, उत्तम पाटील, अमरसिंह पाटील, कृष्णात माळी, जिल्हा परिषदेच्या कोरोची गटाच्या उमेदवार सानिका आवाडे, कबनूर-कोरोची जिल्हा परिषद गटाचे उमेदवार कुमार कांबळे, कोरोची पंचायत समिती गणाचे उमेदवार सुमेध ओऊळकर, कबनूर (पश्चिम) पंचायत समितीचे उमेदवार प्रकाश पाटील यांच्यासह भाजपा महायुतीचे पदाधिकारी आणि दोन्ही गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.