सांगलीच्या सुपुत्राचा दिल्लीत डंका… ‘परीक्षा पे चर्चा २०२६’ साठी कळंबीच्या प्रणवची निवड; पंतप्रधानांशी साधणार संवाद; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ‘प्रणव’चे कौतुक
सांगली : जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर ग्रामीण भागातील मुले काय चमत्कार करू शकतात, याचे जिवंत उदाहरण म्हणजे मिरज तालुक्यातील कळंबी गावचा सुपुत्र प्रणव भोसले. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या ‘परीक्षा पे चर्चा २०२६’ साठी यंदा देशभरातून विक्रमी ४.५ कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या अटीतटीच्या स्पर्धेतून संपूर्ण देशातून केवळ ३६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे, या यादीत महाराष्ट्रातून निवडला गेलेला ‘प्रणव’ हा एकमेव विद्यार्थी ठरला आहे. यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रणव, त्याचे पालक आणि त्याला घडवणारे सर्व शिक्षक यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले, तसेच प्रणवच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देखील दिल्या.
अजितराव घोरपडे विद्यालय, कळंबी येथे १० वीत शिकणारा प्रणव आता थेट राजधानी दिल्लीत पंतप्रधानांशी संवाद साधणार आहे. एका छोट्याशा खेड्यातील शाळेतून सुरू झालेला हा प्रवास आज देशाच्या सर्वोच्च व्यासपीठापर्यंत पोहोचला आहे. ही संधी केवळ प्रणवसाठीच नव्हे, तर महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नांना बळ देणारी ठरेल.
प्रणवच्या या यशात त्याच्या शाळेचा आणि शिक्षकांचा मोठा वाटा आहे. याच गौरवार्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी. एन. पाटील यांनाही या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्तेवर या निमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे. प्रणवचे यश हे केवळ त्याचे वैयक्तिक यश नसून ते सांगलीच्या मातीचे आणि महाराष्ट्राच्या जिद्दीचे प्रतीक आहे. ग्रामीण भागातील गुणवत्तेला योग्य दिशा मिळाली की ती आभाळाला गवसणी घालू शकते, हे त्याने दाखवून दिले, असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.
या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद यांची लिंक पाटील यांनी शेअर केली आहे. नक्की बघा – youtube.com/watch?v=XisxDM…