मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत इचलकरंजीच्या महापौर निवडीवर शिक्कामोर्तब; महापौर होण्याचा मान उदय धातुंडे यांना

15

कोल्हापूर : वस्त्रनगरी इचलकरंजीच्या राजकीय इतिहासात आज एक सुवर्णक्षण नोंदवला गेला. नव्याने स्थापन झालेल्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी उदय धातुंडे यांची, तर उपमहापौरपदी अनिलकुमार देवकरण डालिया (डाळ्या) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या भाजप नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब झाले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीस उपस्थित राहून दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शहराला आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज करण्यासाठी हे नवे नेतृत्व अत्यंत सक्षमपणे कार्य करेल. लोकाभिमुख कारभाराद्वारे इचलकरंजीचा कायापालट करण्याचे आमचे ध्येय आहे, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

महानगरपालिका निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर महापौर पदासाठी अनेक नावे चर्चेत होती. मात्र, पक्षांतर्गत शिस्त आणि सर्वांच्या सहमतीने उदय धातुंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शहरात ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे.

यावेळी आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर,भाजपा शहराध्यक्ष श्रीरंग खवरे व शशिकांत मोहिते, शिवसेना नेते रवीजी माने यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक व भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.