महायुतीची कोल्हापुरात सरशी! रुपाराणी निकम महापौर, तर अक्षय जरग उपमहापौर; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिनंदन

13

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या ५४ वर्षांच्या इतिहासात भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदाच महापौरपद पटकावून इतिहास रचला आहे. रुपाराणी संग्रामसिंह निकम यांची कोल्हापूरच्या ५१ व्या महापौरपदी, तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय जरग यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. महायुतीच्या या विजयाने कोल्हापुरातील काँग्रेसची अनेक वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. या दोघांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पाटील यांनी म्हटले, आई अंबाबाईची कृपा तसेच कोल्हापूरकरांच्या प्रेम व आशीर्वादामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीला प्रथमच रुपाराणीताई निकम यांच्या रूपाने महापौरपद मिळाले. शिवसेना पुरस्कृत जनसुराज्य पक्षाचे अक्षय जरग उपमहापौर म्हणून निवडून आले. कर्नल शंकरराव निकम यांनी कोल्हापूरमध्ये भाजपा विचारधारेची पायाभरणी करत अनेक कार्यकर्ते घडवले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊनच आजचा हा ऐतिहासिक टप्पा गाठता आला. यानिमित्त कर्नल निकम व अशा सर्व कार्यकर्त्यांना स्मरण करून नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांना पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि पारदर्शक प्रशासनासाठी आपले नेतृत्व नक्कीच दिशादर्शक ठरेल, हा आम्हाला विश्वास असल्याचे देखील पाटील म्हणाले.

या निवडणुकीत काँग्रेस हा ३४ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा गाठण्यात त्यांना अपयश आले. आमदार सतेज पाटील यांनी एकाकी झुंज देत काँग्रेसला मोठे यश मिळवून दिले. भाजप २६, शिवसेना शिंदे गट १५, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ४ आणि जनसुराज्य १ यांनी एकत्रित येत ४६ जागांचे संख्याबळ उभे केले, ज्यामुळे महायुतीचा मार्ग मोकळा झाला.

Get real time updates directly on you device, subscribe now.