राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून; अर्थसंकल्प ६ मार्च रोजी मांडण्यात येणार

7

मुंबई : विधानभवन, मुंबई येथे विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समित्यांच्या बैठका पार पडल्या. या बैठकींना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विधान भवन मुंबई येथे सुरु होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सोमवार दि. २३ फेब्रुवारी २०२६ ते २५ मार्च २०२६ पर्यंतचे कामकाज या बैठकीत निश्चित करण्यात आले.

या बैठकीस विधान परिषद सभापती प्रा. रामजी शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णाजी बनसोडे, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिषजी शेलार तसेच आमदार, विधिमंडळाचे सचिव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार, २३ फेब्रुवारी ते बुधवार, २५ मार्च २०२६ पर्यत निश्चित करण्यात आले आहे. ६ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिवंगत अजित पवार यांना कामकाज सल्लागार समितीच्या दोन्ही बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

अधिवेशन काळात शनिवार २८ फेब्रुवारी शासकीय सुट्टीच्या दिवशी विधिमंडळ कामकाज होणार आहे. सोमवार दि. २ मार्च रोजी होळी आणि ३ मार्च रोजी धूलिवंदन असल्याने कामकाज होणार नाही. १९ मार्चला गुढीपाडव्याची सार्वजनिक सुटी असल्याने या दिवशी कामकाज होणार नाही. तसेच २० मार्च रोजीही विधिमंडळ कामकाज होणार नाही.

यावेळी पुढील मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे : –

संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२६ हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. यावर चर्चा करण्यात येणार आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक ९ मार्च रोजी दोन्ही सभागृहात महिला दिनानिमित्त चर्चा होणार आहे.

मराठी भाषा गौरव दिननिमित्त चर्चा होणार आहे.

निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभ होणार आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.