कोथरूडमधील ‘मिसिंग लिंक’चा प्रश्न मार्गी लागणार; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला पालिका आयुक्तांसमवेत आढावा
पुणे : कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ मधील प्रलंबित मिसिंग लिंक संदर्भात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासमवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर आढावा बैठक घेतली. प्रभाग क्रमांक ९ मधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मिसिंग लिंकचा प्रश्न मार्गी लावण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.
सोमेश्वरवाडी–सुतारवाडी, पाषाण तसेच बाणेर–बालेवाडी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता मिसिंग लिंकची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी पाटील यांनी दिले. रस्तारुंदीकरण तातडीने पूर्ण करणे, अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवणे आणि डीपीतील आवश्यक जागांचे जमीन अधिग्रहण लवकरात लवकर पूर्ण करणे यावर भर देण्यात आला. राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याने संबंधित प्रक्रिया गतीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा देणारे प्रकल्प तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.
या बैठकीस प्रभाग क्रमांक ९ मधील भाजपाचे पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.