जैन समाजाची यशोगाथा आता जगासमोर; पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘सकाळ’च्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन
पुणे : पुणे येथे सकाळ समूह प्रकाशित “जैन समाजाची यशोगाथा” या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन ८ फेब्रुवारी रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जैन समाजाने देशाच्या सर्वांगीण प्रगतीत सातत्याने मोलाचे योगदान दिले असून व्यापार, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रांत त्यांनी आदर्श निर्माण केला असल्याचे वक्तव्य यावेळी पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाला मंत्री मंगल प्रभात लोढा, सकाळ माध्यम समूहाचे संपादक सम्राट फडणीस तसेच जैन समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकाशन प्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले की, जैन समाजाने देशाच्या सर्वांगीण प्रगतीत नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे . प्रसिद्धीपासून दूर राहून निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या समाजातील मान्यवरांचे जीवन मानवजातीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, जैन समाजातील युवा पिढीने संशोधन आणि विविध सामाजिक क्षेत्रांत सक्रिय सहभाग घेऊन हे कार्य अधिक बळकट करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही जैन धर्माची मूल्ये आणि शिस्त देशाच्या प्रगतीला पूरक असल्याचे सांगत सकाळ समूहाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
हे ‘कॉफी टेबल बुक’ केवळ व्यक्तींची माहिती देत नाही, तर जैन समाजातील अहिंसा, अपरिग्रह आणि त्याग ही मूल्ये व्यावसायिक जगात कशी यशस्वी ठरली, याचे दर्शन घडवते. सकाळ माध्यम समूहाचे संपादक सम्राट फडणीस यांनी प्रास्ताविकात नमूद केले की, समाजातील अशा ‘अनसंग हीरोज’च्या (प्रसिद्धीझोतात नसलेल्या नायकांच्या) कथा समाजासमोर आणणे ही ‘सकाळ’ची सामाजिक जबाबदारी आहे, असे म्हटले.