शिवरायांच्या बारा किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारले… शिवरायांचा इतिहास, परंपरा आणि वारसा जतन करण्यासाठी ही प्रेरणादायी पायरी – मंत्री चंद्रकांत पाटील

8

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी युनोस्कोच्या फ्रान्स येथील कार्यालयात जाऊन स्वीकारले. या अभिमानास्पद यशासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

पाटील यावेळी म्हणाले, सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमणारा शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा आवाज आता जागतिक स्तरावर अधिकृतपणे पोहोचला आहे. महाराष्ट्राच्या १२ गडकिल्ल्यांचा युनेस्को (UNESCO) जागतिक वारसा यादीत समावेश होणे, ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची आणि अस्मितेची गोष्ट आहे. ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी अशा १२ किल्ल्यांचा समूह ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून संपूर्ण जगासमोर उभा राहिला आहे.

या ऐतिहासिक यशाचे अधिकृत प्रमाणपत्र सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी युनेस्को मुख्यालयात स्वीकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची दूरदृष्टी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे खंबीर नेतृत्व आणि मंत्री आशिषजी शेलार यांचा पाठपुरावा यामुळेच महाराष्ट्राच्या इतिहासाला हे जागतिक कोंदण लाभले आहे. या प्रक्रियेत राजदूत विशाल शर्मा यांचे राजनैतिक योगदानही तितकेच मोलाचे ठरले. शिवरायांचा इतिहास, परंपरा आणि वारसा जतन करण्यासाठी ही प्रेरणादायी पायरी आहे. पुढील पिढ्यांसाठी आपल्या संस्कृतीचा दीप अधिक तेजाने प्रज्वलित ठेवण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची असल्याचे देखील पाटील म्हणाले.

दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर गतवर्षी 11 जुलै 2025 रोजी, यूनेस्कोच्या 47व्या अधिवेशनात, ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील 12 किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले. या मानांकनाचे अधिकृत प्रमाणपत्र महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पॅरिस येथे स्वीकारले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणाशी लढून उभारलेल्या हिंदवी स्वराज्याचे रक्षण, सुरक्षित शासनव्यवस्था आणि लोककल्याण, यासाठी साकारलेली गड-किल्ल्यांची साखळी हा भारतीय इतिहासातील अद्वितीय लष्करी व राज्यकारभाराचा नमुना मानला जातो.

Get real time updates directly on you device, subscribe now.