हर्षवर्धन सपकाळ यांचे वक्तव्य निंदनीय व संतापजनक; राजकीय फायद्यासाठी लांगूलचालन करण्याची काँग्रेसची ही जुनी सवय – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

8

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुलतान हे समकक्षच आहेत असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यभरातून सपकाळ यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची लाखो हिंदूंचा नरसंहार करणाऱ्या टिपू सुलतानशी तुलना करणे हे अत्यंत निंदनीय, संतापजनक असून, करोडो देशभक्तांच्या भावना दुखावणारे असल्याची प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वक्तव्यातून काँग्रेस पक्षाची मूळ भूमिकाच दिसून येते. राजकीय फायद्यासाठी लांगूलचालन करण्याची काँग्रेसची ही जुनी सवय आहे. पण मतांसाठी व तुष्टीकरणासाठी शिवरायांचा अपमान करणे घृणास्पद प्रकार आहे. हा मराठी अस्मितेवर एक प्रकारचा घालाच आहे. छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी तसेच त्यांचे नेते राहुल गांधी यांनी शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे. प्रदेशाध्यक्षपदावरून सपकाळ यांची हकालपट्टी केली पाहिजे. काँग्रेस पक्षासोबत सत्तेची चूल मांडणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुद्धा यावर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे.

इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या विचारांच्या लोकांना जनतेने लोकशाहीच्या माध्यमातून नाकारले आहेच पण भविष्यातसुद्धा अशा शक्तींना मूळापासून उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही. जगभरातील शिवप्रेमी आणि सकल मराठी जन यांच्यासमवेत आम्ही सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करत आहोत असेही पाटील यांनी म्हटले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते, अशी तुलना केलीय. मालेगावच्या उपमहापौर शान- ए -हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचं छायाचित्र लावले आहे. त्यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी ही तुलना केली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.