गाव आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सर्व नवनिर्वाचित सदस्यांना आवाहन

6

कोल्हापूर : कोल्हापूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा रविवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी सर्व विजयी सहकाऱ्यांचे मनःपूर्वक पाटील यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील लोकसेवेच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी संवाद साधताना पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित प्रतिनिधींना एक महत्त्वाचा संदेश दिला. पक्षाची उमेदवारी मिळाली आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले, म्हणूनच तुम्ही आज निवडून आला आहात. त्यामुळे विजयानंतर पक्षाला विसरू नका. जनतेची कामे करून पक्ष संघटनेचा विस्तार करा आणि पक्ष नेतृत्वावर सदैव अढळ विश्वास ठेवा. तसेच, केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून, गाव आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहण्याचे आवाहन केले. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठवान कार्यकर्त्यांमुळेच आज कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष वाढला आहे, याची जाणीव करून देत संघटना अधिक मजबूत करण्याचे निर्देशही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिले.

या सोहळ्याला खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भरमूअण्णा पाटील, माजी आमदार सुरेश हळवणकर, प्रदेश सचिव महेश जाधव, माधवराव घाटगे, समरजितसिंह घाटगे, अशोक चराटी, अनिल डाळ्या, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक निंबाळकर, शहर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, स्वाती कोरी, सावकार मादनाईक, अमरीश घाटगे यांच्यासह भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.