कलेला प्रोत्साहन देण्याची राज्य शासनाची भूमिका – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

10

सांगली : कोणतीही कला ही मानवी शरीराचा अदृश्य भाग असून, एक प्रकारचे पूर्वसंचित आहे. बुध्दी व मनातील हे पूर्वसंचित कलेच्या रूपाने प्रकट होते. या उपजत कलेला प्रोत्साहन देण्याची राज्य शासनाची सदैव भूमिका आहे. कला प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना प्रोत्साहन, प्रतिभाशक्तीला वाव आणि सृजनशीलतेला व्यासपीठ मिळाले आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. शांतिनिकेतन येथे आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पुरस्काराचे मानकरी जी. एस. माजगावकर व त्यांच्या सुविद्य पत्नी, कला संचालक किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, महापालिका सभागृह नेते संदीप आवटी, नवभारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गौतम पाटील, प्रदर्शन अधिकारी स्मिता किंकळे, प्रदर्शन समन्वयक विजय बोंदर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

विविध प्रकारातील कलेचा हा आविष्कार सृजनास बहर आणणारा आहे, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कला क्षेत्राला बळ देण्यासाठी राज्य शासनाने अनेक उपाययोजना व उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये अनेक वर्षे रिक्त असलेली पदभरती, बक्षीस रकमेत भरघोस वाढ, केंद्रीय कला विश्व विद्यालय, कला क्षेत्रातील पदवी व पदविका यासाठी स्वतंत्र व्यवस्था, जहाँगीर आर्ट गॅलरी प्रमाणे जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मध्ये प्रदर्शनासाठी स्वतंत्र आर्ट गॅलरी अशा विविध बाबींचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.

पुरस्काराचे मानकरी ठेरलेल्या जी. एस. माजगावकर यांना कलेसाठी प्रसिद्ध असलेल्या कोणत्याही शहरात भेट देण्यासाठीचा सर्व खर्च प्रायोजित करत असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील शाळा-शाळा मधील विद्यार्थ्यांत कलेची गोडी वाढावी, शाळकरी मुलांनी कलेचा आस्वाद घ्यावा, यासाठी सर्व शाळातील विद्यार्थ्यांनी या कला प्रदर्शनास भेट द्यावी. यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी शाळांना परिपत्रक काढावे. यासाठीच्या सर्व प्रवास खर्चाची तरतूद आपण करू, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.
65 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी सांगलीची निवड केल्याबद्दल आनंद व्यक्त करून खासदार विशाल पाटील म्हणाले, सांगलीला कला क्षेत्रातील मोठी परंपरा आहे. प्रदर्शनातील विविध दालनांतील कलाकृती पाहिल्यानंतर पुढील पिढी ही परंपरा नक्कीच वृद्धींगत करेल. हे प्रदर्शन विनामूल्य खुले असून, अधिकाधिक लोकांपर्यंत याची माहिती द्यावी. प्रदर्शनाला भेट देऊन सहभागी कलाकारांना प्रोत्साहन व दाद देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ज्येष्ठ कलावंत जी. एस. माजगावकर यांचा गौरव

राज्य शासनाच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ज्येष्ठ कलाकार जी. एस. माजगावकर यांच्या दीर्घकालीन कलात्मक आणि शैक्षणिक योगदानाचा गौरव करत, त्यांना सपत्नीक सन्मानित करण्यात आले. यावेळी सन्मानपत्राचे वाचन करण्यात आले. यावेळी श्री. माजगावकर यांनी मार्गदर्शन केले.

1275 उत्कृष्ट कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड

राज्यभरातील या वर्षी राज्यातील विविध कला संस्थांमधून ३ हजार, ४९० विद्यार्थ्यांच्या एकूण ५ हजार ६८० कलाकृती प्राप्त झाल्या असून, त्यापैकी निवड समितीने १,२७५ उत्कृष्ट कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड केली आहे.

आठ विभागात आकर्षक कलाकृतींची मांडणी

प्रदर्शनाची मांडणी एकूण आठ विभागात करण्यात आली असून, यामध्ये रेखा व रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला, कला शिक्षक प्रशिक्षण, कला व हस्त व्यवसाय (धातूकाम, अंतर्गत गृहसजावट, वस्त्रकला, मातकाम), मूलभूत अभ्यासक्रम आणि दिव्यांग विभाग या प्रत्येक विभागातून चार कलाकृतींची पारितोषिकांसाठी निवड करण्यात आली. तसेच शासकीय रेखाकला व बालचित्रकला स्पर्धेतील गुणवंत शालेय विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले.
राज्यातील शासकीय व खासगी कला संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व्यासपीठ मिळावे, यासाठी हे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन आयोजित केले आहे. महाराष्ट्राच्या कला सांस्कृतिक परंपरेचा महत्वपूर्ण वारसा सांगणारे हे 65 वे कला प्रदर्शन सांगलीच्या वैभवात भर घालणारे ठरणार असून, यावेळी पारितोषिक विजेत्या कलाकारांचे अभिनंदन करून मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

उद्घाटनापूर्वी उपस्थित मान्यवरांनी प्रदर्शनातील दालनांना भेट दिली. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात तर राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली. यावेळी राज्यभरातील कलाप्रेमी, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.