उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा : राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांमधील अध्यापकांसाठी ‘कॅस’ (CAS) अंतर्गत शैक्षणिक अर्हतेत शिथिलता
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्थांमधील अध्यापकांना ‘करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम’ (CAS) अंतर्गत मोठा दिलासा देण्यात आला आहे. प्रामुख्याने ज्या अध्यापकांची नियुक्ती दि. १ जानेवारी १९९६ नंतर परंतु दि. २७ फेब्रुवारी २००३ पूर्वी झाली आहे, त्यांना ‘निवड श्रेणी’ (Selection Grade) मिळवण्यासाठी आता पदव्युत्तर पदवी (Post Graduation) धारण करण्याची अट अनिवार्य असणार नाही. यापूर्वी अशा अध्यापकांना उच्च शैक्षणिक अर्हतेच्या अटीमुळे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी मिळण्यास अडचणी येत होत्या, परंतु तत्कालीन सेवाप्रवेश नियमांचा विचार करून शासनाने ही अट शिथिल केली असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
या निर्णयानुसार, अशा पात्र अध्यापकांना ‘वरिष्ठ श्रेणी’ मिळाल्यानंतर ५ वर्षांनी थेट ‘निवड श्रेणी’साठी पात्र मानले जाईल. तसेच, ज्या अध्यापकांनी यापूर्वी उशिरा पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यामुळे त्यांना नंतरच्या तारखेपासून लाभ मिळाला होता, त्यांच्या लाभ देण्याच्या दिनांकात आता सुधारणा करण्यात येईल. पात्र शिक्षकांना या सुधारित दिनांकापासून लागू होणारी वेतनातील फरकाची रक्कम (Arrears) तात्काळ अदा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. हा निर्णय कायमस्वरूपी अध्यापकांसोबतच २७ फेब्रुवारी २००३ पूर्वी अस्थायी किंवा हंगामी स्वरूपात नियुक्त होऊन नंतर नियमित झालेल्या अध्यापकांनाही लागू राहील.
हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणित असून महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) संकेत क्रमांक २०२६०२१८१२२७MT७५०८ वर उपलब्ध आहे.