मॅटच्या (MAT) आदेशानुसार प्राध्यापकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा… डॉ. प्रमोद नाईक समितीच्या शिफारशी लागू; मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबई : तंत्रशिक्षण विभागातील कंत्राटी सेवेतून नियमित झालेल्या प्राध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम (CAS) चे लाभ देण्याबाबत शासनाने महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT), नागपूरच्या आदेशानुसार जुन्या जाचक अटींचा पूर्वलक्षी प्रभाव रद्द करण्यात आला असून डॉ. प्रमोद नाईक समितीच्या शिफारशी लागू केल्या आहेत.
या निर्णयामुळे सन २०१५-१६ मध्ये नियमित झालेल्या प्राध्यापकांना प्रशिक्षणासाठी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, ज्यांनी या काळात प्रशिक्षण पूर्ण केले त्यांना जुन्या तारखेपासून (पूर्वलक्षी) लाभ मिळतील.
तसेच, ५ मार्च २०१० पूर्वी नियुक्त झालेल्या प्राध्यापकांना CAS अंतर्गत उच्च वेतनश्रेणी (PB-4) मिळवण्यासाठी आता Ph.D. ची सक्ती राहणार नाही. विज्ञान व मानव्यशास्त्र विभागातील २००३-०४ च्या प्राध्यापकांना एम.ए. किंवा एम.एस्सी. च्या आधारावरच लाभ दिले जातील. याशिवाय, २००३-०४ नंतर सेवेत आलेल्या कंत्राटी प्राध्यापकांना एम.ई./एम.टेक. पूर्ण करण्यासाठी ३ वर्षांची सवलत देऊन त्यांनाही पदोन्नतीचे लाभ मिळवून दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील शेकडो नियमित प्राध्यापकांचा प्रलंबित आर्थिक प्रश्न सुटणार असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.
हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणित असून महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर (maharashtra.gov.in) संकेत क्रमांक २०२६०२१८१२२७MT७५०८ वर उपलब्ध आहे.