प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करून त्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न शिक्षण क्षेत्राला अधिक बळकटी देईल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : महायुती सरकार आपल्या शिक्षक आणि प्राध्यापकांच्या प्रगतीसाठी सदैव कटीबद्ध आहे. याच भावनेतून, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ‘करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम’ (CAS) अंतर्गत पदोन्नती प्रक्रियेतील त्रुटी दूर करून एक अत्यंत महत्त्वाचे शुद्धीपत्रक निर्गमित केले आहे. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली.
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाने (MAT) दिलेल्या आदेशाचा आदर राखत आम्ही ३ जून २०२२ च्या शासन निर्णयातील API/PBAS अटींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ८००० रुपये ग्रेड पे (Stage 3) मध्ये ३ वर्षे पूर्ण करणाऱ्या सहायक प्राध्यापक आणि अधिव्याख्यात्यांना ९००० रुपये ग्रेड पे (Stage 4) सह ‘सहयोगी प्राध्यापक’ पदावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, ज्यांची सेवा ५ मार्च २०१० नंतर सुरू झाली आहे, त्यांच्यासाठी Ph.D. पदवी असणे अनिवार्य असेल.
पारदर्शकता राखण्यासाठी आम्ही या पदोन्नती प्रक्रियेची कालमर्यादा निश्चित केली आहे. १० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे प्रस्ताव ५ व्या वेतन आयोगानुसार, ११ सप्टेंबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यानचे प्रस्ताव ६ व्या वेतन आयोगानुसार, तर १ जानेवारी २०२५ पासूनचे सर्व प्रस्ताव ७ व्या वेतन आयोगाच्या तरतुदींनुसार मार्गी लावले जातील. प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करून त्यांना न्याय देण्याचा आमचा हा प्रयत्न शिक्षण क्षेत्राला अधिक बळकटी देईल, असा विश्वास असल्याचे पाटील यांनी म्हटले.
हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणित असून महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) संकेत क्रमांक २०२६०२१८१२२७MT७५०८ वर उपलब्ध आहे.