कोथरूडच्या ‘मानसी प्रकल्पा’ची प्रेरणा आता सोलापुरात; गोदुताई विडी घरकुलमधील वस्तीतील लेकींच्या योगसाधनेला मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात प्रारंभ

27

सोलापूर : पुण्यातील कोथरूड मतदारसंघात लोकसहभागातून यशस्वी ठरलेल्या ‘मानसी प्रकल्पा’ची प्रेरणा आता सोलापूर शहरातही पोहोचली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या सामाजिक बांधिलकीच्या संस्कारातून वस्ती भागातील मुलींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सोलापुरात ‘आई’ प्रतिष्ठानच्या वतीने योगसाधना उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत गोदुताई विडी घरकुल वसाहतीतील योग केंद्राचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल अत्यंत उत्साहात संपन्न झाले.

यावेळी बोलताना ना. चंद्रकांत पाटील म्हणाले की, “कार्यकर्त्याने केवळ राजकीय काम न करता समाजाशी बांधिलकी राखत काम करावे, हा माझा कायमचा आग्रह असतो. कोथरूडमधील मानसी प्रकल्प आज विस्तारत आहे, याचा आनंद आहेच; पण त्याच धर्तीवर सोलापूरमधील वस्ती भागातील मुलींसाठी ‘आई’ प्रतिष्ठानने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. योगसाधनेमुळे या लेकींमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि सशक्त जीवनमूल्यांची जडणघडण होताना पाहणे हे माझ्यासाठी मोठे समाधान आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वस्ती भागातील लहान मुलींनी योगासनांची अत्यंत कठीण आणि शिस्तबद्ध प्रात्यक्षिके सादर केली. ही प्रात्यक्षिके पाहून उपस्थित सर्वच मान्यवर भारावून गेले. या मुलींना योगसाधनेसाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने मंत्री महोदयांच्या हस्ते विशेष ‘योग किट’चे वाटप करण्यात आले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील, मोहन डांगरे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, वैशाली कबाडे, आग्रजा चिटणीस-वरेरकर, उद्योजक यतिन शाह, सुहासिनी शाह, सृष्टी डांगरे यांच्यासह मान्यवर व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.