शिवजयंतीनिमित्त ‘आदर्श विद्यालयात’ ‘शिवकालीन साहित्य प्रदर्शन; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट
पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवार पेठेतील ‘आदर्श विद्यालय’ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवकालीन साहित्य प्रदर्शनास’ भेट दिली. या प्रदर्शनात शिवकाळातील विविध शस्त्रे, दुर्मिळ कागदपत्रे आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या वस्तूंची त्यांनी यावेळी पाहणी केली.
स्वराज्याच्या इतिहासातील ते सुवर्णक्षण आणि महाराजांची दूरदृष्टी या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अनुभवता आली असल्याचे मत पाटील यांनी येथे व्यक्त केले. हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आदर्श विद्यालयाने केलेला हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा जवळून अनुभवताना एक वेगळीच ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
आपला गौरवशाली इतिहास आणि संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आदर्श विद्यालयाने केलेला हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना शिवकालीन युद्धकला आणि स्वराज्याच्या जडणघडणीची प्रत्यक्ष माहिती मिळण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी विद्यालयाचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.