उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पुण्यात क्रीडा व सांस्कृतिक जागर; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव!

6

पुणे  : पुणे येथे आज महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण संचालनालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च शिक्षण संचालनालय व अधिनस्त कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या महोत्सवास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून विविध स्पर्धांतील विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी पाटील यांनी म्हटले, कार्यालयीन जबाबदाऱ्या सांभाळताना कर्मचाऱ्यांना आनंद, उत्साह आणि टीमस्पिरिट अनुभवता यावे, यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करणे ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमुळे केवळ ताणतणाव कमी होत नाही, तर कार्यक्षमता, समन्वय आणि आत्मविश्वासही वाढीस लागतो, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

या महोत्सवात क्रिकेट, बॅडमिंटन यांसारख्या क्रीडा प्रकारांसह विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री महोदयांनी सर्व सहभागी कर्मचारी आणि विजेत्यांचे अभिनंदन करत, त्यांच्या खेळाडूवृत्तीचे कौतुक केले.

या प्रसंगी उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, रजिस्ट्रार डॉ. चाराशिला गायके यांच्यासह विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.