अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम संपन्न… जनसामान्यांना दिलासा देणारा आणि आर्थिक शिस्त राखणारा अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सोमवार दि. २३ फेब्रुवारी २०२६ पासून मुंबईत सुरुवात होत आहे. राज्याच्या विकासाला नवी गती देणारे आणि जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणारे हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे आयोजित चहापानाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधीमंडळाचे सदस्य उपस्थित होते.
संसदीय कार्य मंत्री म्हणून, हे अधिवेशन सुरळित पार पडावे आणि लोकशाहीच्या या पवित्र मंदिरात राज्याच्या हिताची सकारात्मक चर्चा व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे पाटील यावेळी म्हणाले. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. राज्याच्या येत्या अर्थसंकल्पामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अपेक्षित असलेले सर्व मुद्दे, सूचना अंतर्भूत करण्यात येतील. तसेच जनसामान्यांना दिलासा देत असताना आर्थिक शिस्त देखील पाळली जाईल यासाठी काही कडक पावलेही उचलायची आवश्यकता वाटल्यास उचलली जातील. जनसामान्यांना दिलासा देणारा आणि आर्थिक शिस्त राखणारा अर्थसंकल्प सादर केला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या अर्थसंकल्पिय अधिवेशनात १५ विधेयके मांडण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, येत्या ६ मार्चला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पासाठी प्रचंड तयारी केली होती. एक चांगला अर्थसंकल्प मांडण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, दुर्देवाने हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ माझ्यावर आली आहे. अजित पवार हे अर्थव्यवस्थेची शिस्त सातत्याने पाळायचे, असे त्यांनी सांगितले.
नुकत्याच केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला २ हजार कोटी रुपयांची अधिकची वाढ मिळाली आहे. तसेच कर वाटपातून ९८ हजार ३०६ कोटी रुपये मिळणार आहेत. केंद्रशासनाकडे राज्य शासनाने केलेली मागणी बहुतांशी मान्य केल्यामुळे महाराष्ट्राला चांगला फायदा होणार आहे. केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात आपल्याला दोन हायस्पिड कॉरिडॉर मिळाले आहेत. रेल्वेच्या अर्थसंकल्पातही आपल्याला २३ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. गेल्या काही काळापासून केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आपल्याला निधी मिळत आहे.व्हिबी जीरामजी या योजनेत आपण केलेली अधिक मनुष्यबळाची मागणी केंद्र शासनाने मान्य केली असून महाराष्ट्राला १३०० लाख मनुष्यबळ दिवसावरून १६०० लाख मनुष्यबळ दिवस वाढवून मिळाले आहेत. त्यामुळे जवळपास चौदाशे कोटी रुपये अतिरिक्त मिळणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे राज्याची सर्व क्षेत्रात प्रगती सुरू – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दावोसमध्ये झालेले ३० लाख कोटींचे औद्योगिक करार त्यातून ४० ते ५० लाख रोजगारनिर्मितीचा होणार आहे. राज्यात पायाभूत सुविधांवर सुमारे एक लाख कोटी रुपयांची कामे सुरू आहेत.एमएमआरडीएच्या वतीने ४६ हजार कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईला वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी बीकेसी–कुर्ला टनेल, बोरिवली–ठाणे टनेल आणि मुलुंड टनेल प्रकल्प राबवले जात आहेत. त्यामुळे राज्याची सर्व क्षेत्रात प्रगती सुरू आहे.
एमएमआरडीएच्या कामांदरम्यान घडलेल्या दुर्घटनेबाबत बोलताना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून संबंधित कंपनीला ५ कोटी रुपये व सल्लागाराला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून सेफ्टी व स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश देण्यात आले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी व एमएमआरडीएमार्फत प्रत्येकी १५ लाख रुपयांची मदत देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यंदाचा अर्थसंकल्प सर्वांगिण विकासाला चालना देणारा ठरेल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा विश्वास
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणारा चहापान कार्यक्रम हा केवळ औपचारिक नसून संवादाचा प्रभावी मंच आहे. या माध्यमातून राज्याच्या विकासावर विधायक चर्चा होऊन जनतेचे प्रश्न मार्गी लागतात. या माध्यमातून जनतेने दिलेल्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. दिवंगत अजित पवार यांनी ११ वेळा अर्थसंकल्प सादर करत राज्याच्या आर्थिक वाढीत मोलाचा वाटा उचलला आहे. विकास आणि आर्थिक शिस्त यांचा समतोल राखत महाराष्ट्राला सक्षम दिशा देण्याचे काम अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना केले.
यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री सादर करणार असून, राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आणि सर्व घटकांना न्याय देणारा असेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.