भाजपच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा…नवी टीम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, सुशासनासाठी आणि तळागाळातील जनतेच्या हितासाठी अधिक जोमाने कार्य करेल – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. 12 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस,12 चिटणीस, कोषाध्यक्ष, सह कोषाध्यक्ष, मुख्य प्रवक्ता, विविध मोर्चाच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जाहीर झालेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हार्दिक अभिनंदन केले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह , राष्ट्रीय अध्यक्षनितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही नवी टीम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, सुशासनासाठी आणि तळागाळातील जनतेच्या हितासाठी अधिक जोमाने कार्य करेल, याचा विश्वास आहे. पक्षाची विचारधारा आणि विकासाची गाथा घराघरांत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण एकजुटीने प्रयत्न करूया, असे पाटील यांनी म्हटले.
पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा भाजपा प्रदेश कार्यालयात करण्यात आली. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. जुन्या आणि नव्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे चव्हाण म्हणाले.
प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील, अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेश सरचिटणीस म्हणून आ.निरंजन डावखरे, आ.योगेश सागर, आ. संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनील राणे या सहा जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रवक्ते म्हणून नवनाथ बन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.