बालेवाडी-वाकडच्या वाहतूक कोंडीतून सुटका; ‘कस्पटे वस्ती मिसिंग लिंक’चा मार्ग मोकळा, मंत्री चंद्रकांत पाटलांच्या पाठपुराव्याला मोठे यश

5

पुणे : बालेवाडी आणि वाकड परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘कस्पटे वस्ती मिसिंग लिंक’ प्रकल्पातील सर्व कायदेशीर अडथळे आता दूर झाले आहेत. माननीय उच्च न्यायालयाने या प्रकल्पाबाबत सकारात्मक निकाल देत जमिनीच्या संपादनावरील स्थगिती उठवली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, वर्षभराच्या आत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी याबाबत म्हटले, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेले अनेक महिने सातत्याने प्रयत्नशील होतो. दोन आठवड्यांपूर्वीच पाटील यांनी महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन या कामाचा सविस्तर आढावा घेतला होता. केवळ २०० मीटर जागेच्या जमीन संपादनाचे काम उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे रखडल्याचे लक्षात आल्यावर, प्रशासनाला या रस्त्याची निकड आणि जनतेची होणारी गैरसोय न्यायालयाच्या निदर्शनास प्रभावीपणे आणून देण्याच्या सूचना केल्या होत्या. महापालिकेने ही बाजू भक्कमपणे मांडली आणि अखेर न्यायालयानेही या विषयाचे गांभीर्य ओळखून कामाला गती देण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

माननीय न्यायालयाच्या या निर्णयानंतर पाटील यांनी तत्काळ महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आहे. जमीन संपादनाची प्रक्रिया आता युद्धपातळीवर पूर्ण करून, प्रत्यक्ष कामाला गती द्यावी आणि न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करून नियोजित वेळेत हा रस्ता पूर्ण करावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. बालेवाडी आणि वाकडला जोडणारा हा पूल आणि मिसिंग लिंक पूर्ण झाल्यावर या भागातील दळणवळण सुलभ होईल. पाटील यांच्या मतदारसंघातील विकासकामांमध्ये कोणताही अडथळा येऊ न देता, नागरिकांच्या सुविधेसाठी सदैव कटिबद्ध असल्याचे पाटील यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.