महापालिकेच्या उत्पन्न वाढीसह शहर प्रदूषणमुक्तीवर भर -स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची माहिती

मनपाच्या पहिल्या स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांना मान्यता

9

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासोबतच शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘इन्कम जनरेशन’ आणि ‘प्रदूषण नियंत्रण’ या दोन सूत्रांवर भर दिला जाणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी आज दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अभिषेक बारणे होते.

या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर,नगरसचिव मुकेश कोळप , अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्यासह समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते. स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सभापती अभिषेक बारणे यांनी दिली. स्थायी समिती सभापती दालनात प्रशासकीय कामकाजाबाबत सविस्तर भूमिका मांडताना ते बोलत होते.

बैठकीत मनपाच्या मुख्य लेखा विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रजा मंजुरी कामी सादर केलेल्या विनंती अर्जाला मंजुरी देण्यात आली. तसेच, महापालिकेच्या वतीने “मराठी भाषा गौरव दिना”निमित्त दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमासाठी यामध्ये कलाकार, वक्ते मानधन, सांस्कृतिक कार्यक्रम असा एकूण खर्च र. रु. ७,५०,०००/- (अक्षरी र.रु. सात लाख पन्नास हजार फक्त) इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

प्रदूषणमुक्तीसाठी ‘ॲक्शन प्लॅन’
शहरात सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत सभापती अभिषेक बारणे यांनी कडक पावले उचलली आहेत. “शहरात धुळीचे प्रमाण वाढू नये आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी बांधकाम सुरक्षा (Safety) तपासण्यासाठी दोन विशेष पथके तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्या हद्दीतील मोठ्या कामांची प्रगती आणि सुरक्षिततेची नियमित देखरेख करावी,” असे निर्देश सभापती बारणे यांनी बैठकीत दिले.

महापालिकेच्या उत्पन्न वाढीवर लक्ष; कर्जमुक्तीकडे वाटचाल

महापालिकेच्या आर्थिक नियोजनाबाबत बोलताना अभिषेक बारणे यांनी स्पष्ट केले की, सध्या पालिकेवर दायित्व (Liability) अधिक आहे. “नवीन कामांपेक्षा आधीचे प्रकल्प पूर्ण करणे आणि पालिकेचे उत्पन्न वाढवणे हे आमचे प्राधान्य आहे. वाकडसह उपनगरांतील कर संकलन वाढवणे आणि होर्डिंग्जच्या माध्यमातून महसुलात भर टाकणे यावर आम्ही भर देत आहोत. निधी वाढल्यास शहराच्या वैभवात भर घालणारी कामे वेगाने होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, महापालिकेवर असलेले कर्ज कमी करून शहर कर्जमुक्त करण्याच्या दिशेने सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

खर्चात कपात आणि पारदर्शक कारभार

पदाधिकाऱ्यांच्या वाहन भाड्याबाबत होणाऱ्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना सभापती अभिषेक बारणे म्हणाले की, “चालकांची कमतरता असल्याने भाडेतत्त्वावर गाड्या घेण्याचे जुने धोरण आहे. मात्र, सव्वा लाख रुपये महिना यांसारख्या मोठ्या बिलांची आणि दरांची आम्ही पुन्हा शहानिशा करणार आहोत. इंधन, चालक आणि देखभाल यासह वाजवी दरात सेवा मिळावी, यासाठी खर्चात कपात करण्याचे आमचे धोरण आहे.” त्यानुसार पदाधिकारी स्वेच्छेनुसार त्यांना दरमहा ५० हजार रुपये खर्च देण्याबाबत विचार विनिमय सुरु आहे. तसेच, प्रत्येक विभागाच्या कामाचा आढावा घेऊनच बिले अदा केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या ठेवींबाबत भाष्य करताना अभिषेक बारणे यांनी सांगितले की, “महापालिकेच्या आवश्यक ठेवींमध्ये कोणतीही घट झालेली नाही. त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत. तरीही, या आरोपांची सविस्तर माहिती घेऊन योग्य ती चौकशी केली जाईल.” अत्यावश्यक नसलेली नवीन कामे तूर्तास थांबवून केवळ गरजेच्या कामांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. आजच्या सभेत प्रलंबित राहिलेल्या विषयांवर आणि विविध उपसूचनांवर पुढील तहकूब सभेत सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. कोणत्या विभागाने किती कामे केली आणि कोणती प्रलंबित ठेवली, याचा ‘प्रोग्रेस रिपोर्ट’ही संबंधित अधिकारी यांच्याकडे मागविला असल्याचे त्यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.