प्राध्यापक भरती प्रक्रिया जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील रिक्त असलेली प्राध्यापकांची पदे भरण्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही संपूर्ण भरती प्रक्रिया जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यापीठांनी केलेल्या तयारीचा आढावा पाटील यांनी घेतला. धोरण राबवताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील रँकिंग सुधारण्यासाठी गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना कुलगुरूंना देण्यात आल्या आहेत. संशोधनावर अधिक भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे तसेच अकृषी विद्यापीठांचे सर्व कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.