समाजातील ज्वलंत प्रश्न मांडण्यासोबतच, सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना बळ देणे ही ‘सकाळ’ची गौरवशाली परंपरा; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून गौरव
मुंबई : पत्रकारितेतील निस्पृहता आणि विश्वासार्हतेचे प्रतीक असलेल्या ‘दैनिक सकाळ’च्या मुंबई आवृत्तीचा ५५ वा वर्धापन दिन सोहळा प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष उपस्थिती लावून ‘सकाळ’ परिवाराला शुभेच्छा दिल्या. मुंबईसारख्या महानगरात गेल्या अनेक दशकांपासून ‘सकाळ’ने आपली स्वतंत्र ओळख जपत वाचकांचा विश्वास संपादन केला आहे. ही वाटचाल आदर्श पत्रकारितेचे उदाहरण असल्याचे प्रतिपादन मंत्री पाटील यांनी केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री अदिती तटकरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, अभिनेते रितेश देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.यासोबतच सकाळ समूहातील मान्यवर, पत्रकार बंधू-भगिनी आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात ‘सकाळ सन्मान’ पुरस्कारांच्या माध्यमातून निस्वार्थपणे समाजासाठी झटणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पाटील यांनी म्हटले कि, गेल्या अनेक दशकांपासून ‘सकाळ’ने केवळ बातम्या न देता, आपल्या लेखणीतून समाजाला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. समाजातील ज्वलंत प्रश्न मांडण्यासोबतच, सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना बळ देणे ही ‘सकाळ’ची गौरवशाली परंपरा आहे. सकाळ परिवारातील सर्व सदस्यांना आणि वाचकवर्गाला या वर्धापनदिनानिमित्त माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा! ‘सकाळ’चा हा प्रबोधनाचा वारसा असाच अखंड सुरू राहो, अशी सदिच्छा पाटील यांनी व्यक्त केली.