मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक; मराठवाड्यातील दाखल्यांच्या वितरणाचा मंत्री विखे पाटील आणि मंत्री चंद्रकांत पाटलांकडून आढावा
मुंबई : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा समितीचे सदस्य चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे, समितीचे सदस्य मंत्री बाबासाहेब पाटील, आशिष शेलार, दादा भुसे, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच विविध विभागांचे आयुक्त आणि संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले.
या बैठकीत प्राधान्याने मराठवाड्यातील मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या दाखल्यांच्या वितरणाचा आढावा घेण्यात आला. प्रशासकीय स्तरावर दाखले देताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. तसेच सातारा गॅझेट लागू करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी तातडीने अहवाल सादर करावा, अशा मार्गदर्शक सूचना संदीप शिंदे यांनी केल्या असून त्यानुसार सातारा जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
यासोबतच मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीचाही सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला.