‘कला फाउंडेशन’अभ्यासक्रमाचे स्वरूप बदलून ‘सर्टिफिकेट इन आर्ट अँड डिझाईन’ हा एक वर्षाचा नवा कोर्स सुरू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : जी.डी. आर्ट पदविका अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या ‘कला फाउंडेशन’ सर्टिफिकेट कोर्सचे स्वरूप बदलून त्याऐवजी ‘सर्टिफिकेट इन आर्ट अँड डिझाईन’ हा एक वर्षाचा नवा कोर्स सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य शेखर निकम यांनी जीडी आर्ट पदविका अभ्यासक्रमासाठी ‘कला फाउंडेशन’ अभ्यासक्रमाची अट रद्द केल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
यावेळी पाटील म्हणाले की, पूर्वीचा फाउंडेशन कोर्स स्वतंत्र सर्टिफिकेट कोर्स होता. मात्र, तो पूर्ण केल्यानंतर डिप्लोमा अभ्यासक्रमात प्रवेशासाठी स्वतंत्र जागा राखीव नव्हत्या. त्यामुळे त्याऐवजी ‘सर्टिफिकेट इन आर्ट अँड डिझाईन’ हा एक वर्षाचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना जीडी आर्ट डिप्लोमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळू शकतो. सध्या यासाठी १० टक्के जागांची तरतूद आहे. ही टक्केवारी वाढवण्याबाबतही विचार करण्यात येईल.
तसेच बहुतांश तांत्रिक अभ्यासक्रमांमध्येही दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशासाठी साधारणपणे १० टक्के जागा गृहित धरल्या जातात. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची संख्या आणि रिक्त जागा यांचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.