मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ७.६९ लाख कोटींचा विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर…विकसित महाराष्ट्र@२०४७’ च्या दिशेने प्रवास सुरु! – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा ७ लाख ६९ हजार ४६७ कोटी रुपयांच्या आकारमानाचा अर्थसंकल्प शुक्रवारी विधानसभेत सादर केला. ‘विकसित महाराष्ट्र@२०४७’ च्या दिशेने सुरु झालेल्या प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा असल्याची प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन असल्याने ‘विकसित भारत@२०४७’च्या स्वप्नपूर्तीत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सन २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे मुख्य ध्येय देवेंद्रजींनी आजच्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने ठेवले आहे. त्यासाठीचे ‘विकसित महाराष्ट्र@२०४७’ चे व्हिजन डॉक्युमेंट जाहीरही केले आहे. राज्याच्या संतुलित विकासाला चालना देण्यासाठी प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक, सुशासन या चार स्तभांच्या अंतर्गत विविध क्षेत्रे निश्चित केली आहेत. शेतकरी, महिला, युवा, गरीब, विद्यार्थ्यांसह विविध समाजघटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प अर्थसंकल्पाच्या निमित्ताने आज महायुती सरकारने केला असल्याची मत पाटील यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची अर्थव्यवस्था पुढील काही वर्षांत एक ट्रिलियन डॉलरच्या टप्प्यावर पोहोचवण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले. या उद्दिष्टासाठी पायाभूत सुविधा, उद्योग, शेती, शिक्षण आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 रोजी पीककर्ज थकित असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांची 200 वी जयंती 11 एप्रिल 2026 यावर्षी आहे. त्यासाठी एक समिती स्थापन करुन विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येईल, त्यासाठी निधी देणार असून महात्मा फुले यांचे जन्मगाव मौजे कटगुण, जिल्हा सातारा येथे भव्य स्मारक उभारणार आहे. तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, जिल्हा सातारा येथे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड, चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त पायाभूत सोयीसुविधांचा विकास आराखडा तयार करणार आहे. जगदगुरु तुकाराम महाराजांचे देहू येथील घर आणि जन्मस्थानाचे जतन, संवर्धनासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. नवरगाव, रामटेक येथे राज्यातील तिसरी चित्रनगरी विकसित करण्यात येणार आहे. नव्यापिढीला महाकवी कालिदास यांच्या साहित्याची ओळख व्हावी, त्यांचे जीवनचरित्र नव्या पिढ्यांना कळण्यासाठी चित्रपट निर्मिती करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून राज्य शासन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे स्मारक उभारणार असून अजित पवार यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राज्य आणि जिल्हा योजनांचे एकत्रिकरण करुन पशुधनात स्वयंपूर्णता, रोजगारनिर्मितीवर भर देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त गो-पालक, कुक्कुटपालक व शेळीपालक यांच्यासाठी विशेष कार्यक्रम सुरु करणार असून मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेमध्ये प्रतिवर्षी 1240 कोटी रुपये देण्यात येणार आहे,त्याचा 20,594 मासेमारांना लाभ मिळेल.
या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एकल महिला धोरण राबवण्यात येणार असून त्यासाठी सर्व जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण सुरु असून, अहवालाचे विश्लेषण करुन धोरण आणण्यात येईल. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या विविध योजनांनाही अर्थसंकल्पात चालना देण्यात आली आहे.
महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा ₹7,69,467 कोटींचा अर्थसंकल्प शासनाने सादर केला असून तो “विकसित महाराष्ट्र 2047” या दीर्घकालीन रोडमॅपवर आधारित तयार करण्यात आला आहे. यावेळी प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार प्रमुख स्तंभांवर आधारित चार क्षेत्रे आणि 16 उपक्षेत्रांच्या माध्यमातून अर्थसंकल्पाची मांडणी करण्यात आली आहे.