प्राध्यापक भरती प्रक्रिया जूनपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठांमधील रिक्त प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया जून 2026 पूर्वी पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य अभिजीत वंजारी, प्रविण दरेकर, सत्यजीत तांबे, मनीषा कायंदे, जयंत आसगावकर यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
मंत्री पाटील म्हणाले, 31 जानेवारी 2018 रोजी राज्यातील रिक्त पदांच्या आधारे 40 टक्के म्हणजे 3,580 पदे भरण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर कोविड काळात 1,492 पदे भरली गेली, तर 2,088 पदे रिक्त राहिली. पुढे 12 नोव्हेंबर 2021 रोजी पुन्हा भरतीला परवानगी मिळाली आणि त्यानंतरच्या प्रक्रियेत सध्या काही पदे शिल्लक राहिली आहेत. सध्या राज्यात 31,185 मंजूर पदांपैकी 19,267 पदे भरलेली असून 11,918 पदे रिक्त आहेत. यापैकी 5,012 पदे भरण्यास शासनाने परवानगी दिली असून एकूण सुमारे 5,500 पदांसाठी मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन मान्यता देण्यात आली असून अर्थ विभागाकडूनही आवश्यक प्रक्रिया सुरू आहे. प्राध्यापकांचे पगार आणि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवरील खर्च हा अनिवार्य स्वरूपाचा असल्याने त्यासाठी निधीची कोणतीही अडचण येणार नसल्याचे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.