लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६’ हा सोहळा उत्साहात संपन्न… दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘जीवनगौरव’ प्रदान
मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि चर्चेत असणारा बहुप्रतीक्षित लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२६ हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ अभिनेते आमिर खान, विकी कौशल यांसह राज्यभरातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.

या कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीचे दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘जीवनगौरव’ पुरस्काराने, तर अभिनेता विकी कौशल याला ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजकीय क्षेत्रात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना ‘आऊटस्टँडिंग पॉलिटिशियन’ हा बहुमान मिळाला, तर सामाजिक स्तरावर बंजारा भाषेतील अनुवादाच्या अमूल्य कार्यासाठी उमेशजी खोसे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेते आमिर खान यांच्यातील ‘महामुलाखत’ ठरली. राज्याचा सर्वांगीण विकास, सामाजिक समस्या आणि बदलत्या काळानुसार आपली जबाबदारी यावर त्यांनी केलेले भाष्य अत्यंत प्रगल्भ आणि मार्गदर्शक होते. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि ऋषी दर्डा यांनी या सोहळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गुणवंतांना जे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, ते खरोखरच कौतुकास्पद असल्याचे पाटील यांनी म्हटले.
याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री आशिष शेलार यांसह मंत्रिमंडळातील अनेक सहकारी आणि आध्यात्मिक गुरु गौर गोपालदासजी यांची उपस्थिती लक्षणीय होती.