मुंबईतील ऐतिहासिक जहांगीर आर्ट गॅलरी येथे ‘६५ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे’ उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न
मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक जहांगीर आर्ट गॅलरी येथे ‘६५ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे’ उद्घाटन मंगळवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्रदर्शनाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या विशेष स्मरणिकेचे (Souvenir) प्रकाशनही पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, महाराष्ट्राची कला संस्कृती जागतिक स्तरावर नेण्याचे सामर्थ्य आपल्या कलाकारांमध्ये आहे, याची प्रचिती आज येथील कलाकृती पाहून आली. महाराष्ट्राच्या समृद्ध कलापरंपरेला आधुनिकतेची जोड देण्यासाठी सर जे. जे. कला महाविद्यालयाच्या परिसरात एका भव्य आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त आर्ट गॅलरीची उभारणी करण्याची घोषणा यावेळी पाटील यांनी केली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दृश्य कलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एका थोर कलाकाराचा राज्य शासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावर्षी ज्येष्ठ व नामवंत कलाकार श्री. विलास शिंदे यांचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
हे वैविध्यपूर्ण कला प्रदर्शन दि. ११ मार्च २०२६ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत सकाळी ११.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा येथे सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी या कलाविष्काराचा आनंद घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिम चॅटर्जी, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, संबंधित अधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.