महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, तसेच जनहिताच्या कामांना व प्रगतीला अधिक वेग मिळेल – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृह येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली. महाराष्ट्राचे २६ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी लोकभवन, मुंबई येथे पदभार स्वीकाराला, त्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. शपथविधी सोहळ्याला विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अन्न व औषध प्रशासन नरहरी झिरवळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेन भारती, मुख्य राज्य शिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
याबाबत पाटील यांनी म्हटले, आगामी काळात महामहीम राज्यपाल मा. जिष्णु देव वर्मा जी यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, तसेच जनहिताच्या कामांना व प्रगतीला अधिक वेग मिळेल. तसेच केंद्र आणि राज्य यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होईल, अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली. राज्यपाल महोदयांना महाराष्ट्रातील पुढील कार्यकाळासाठी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
सुरुवातीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जिष्णू देव वर्मा यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधी नंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.