पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा! ७५० नृत्यांगनांचा रंगणार भव्य ‘नृत्य महोत्सव २०२६’
पुणे : विद्येचे माहेरघर आणि कलेची जननी असलेल्या पुणे शहरात भारतीय शास्त्रीय नृत्याचा वारसा जपणारा एक अभूतपूर्व सोहळा रंगणार आहे. ‘नृत्य महोत्सव २०२६’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या महोत्सवाबद्दल विशेष माहिती दिली आहे.
७५० नृत्यांगनांचा महाकुंभ
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे तब्बल ७५० नृत्यांगना एकाच मंचावर आपली कला सादर करणार आहेत. भारतीय संस्कृतीतील शास्त्रीय नृत्याचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि या कलेचा गौरव करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा नृत्याचा महाकुंभ पुणेकरांसाठी डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरेल.
सदर कार्यक्रम दिनांक २८ आणि २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता शुभारंभ लॉन्स, पुणे येथे संपन्न होणार आहे. सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश असणार आहे. भारतीय संस्कृतीचा हा अद्भूत संगम अनुभवण्यासाठी आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.