उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची सदिच्छा भेट
मुंबई : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईतील लोकभवन येथे महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यातील उच्च आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातील भविष्यातील वाटचालीवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
या बैठकीचा मुख्य केंद्रबिंदू महाराष्ट्रात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ (NEP 2020) ची प्रभावी अंमलबजावणी हा होता. हे धोरण राज्यात कशा प्रकारे अधिक सक्षमपणे राबवता येईल आणि त्याद्वारे शैक्षणिक आराखड्यात कोणते बदल अपेक्षित आहेत, यावर मंत्र्यांनी राज्यपालांशी सविस्तर चर्चा केली.
उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि तांत्रिक शिक्षणात आधुनिक उपक्रम राबवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे पाटील यांनी यावेळी नमूद केले. विद्यार्थ्यांना केवळ पदवी न मिळता, त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करून रोजगाराच्या जागतिक संधी कशा उपलब्ध करून देता येतील, यावर या भेटीत सकारात्मक विचारविनिमय झाला.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री. बी. वेणुगोपाल हे देखील उपस्थित होते.