कार्यकर्त्यांपर्यंत विचार पोहोचवण्यासाठी ‘वक्ता प्रशिक्षण’ काळाची गरज – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : भारतीय जनता पार्टीची विचारधारा समाजाच्या तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पुणे येथे आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत पुणे आणि सातारा जिल्ह्याचा ‘वक्ता प्रशिक्षण वर्ग’ आज उत्साहात संपन्न झाला, याप्रसंगी ते बोलत होते.
या प्रशिक्षण वर्गाच्या समारोप सत्राला चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संघटनेची ध्येयधोरणे आणि विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी वक्तृत्व आणि वैचारिक स्पष्टता किती महत्त्वाची आहे, यावर मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षण वर्गात पुणे आणि सातारा जिल्ह्यातील भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि नवनिर्वाचित नगरसेवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. आगामी काळात पक्षाची भूमिका अधिक आक्रमकपणे आणि स्पष्टपणे मांडण्यासाठी या प्रशिक्षण वर्गाचा मोठा उपयोग होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार योगेश सागर, राजेश पांडे, चिटणीस ॲड. वर्षाताई डहाळे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. तसेच पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर वडणे, प्रदीप कंद, प्रियाताई शिंदे आणि माजी आमदार संजय जगताप हे देखील उपस्थित होते.