मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद उपाधी प्रदान… ही पदवी बहाल करून त्यांच्या दूरदृष्टीचा एक सन्मान – मंत्री चंद्रकांत पाटील

6

अहिल्यानगर  : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी’च्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ३९ वा पदवीप्रदान समारंभ राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. देवेंद्रजींनी आता ‘डॉक्टरेट’ची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे, ही आम्हा सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, आज महात्मा फुले कृषी विद्यापीठाने त्यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी बहाल करून त्यांच्या दूरदृष्टीचा एक सन्मान केला आहे. कृषी क्षेत्रातील प्रगती आणि जलसंधारणाच्या कामात देवेंद्रजींनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. विशेष म्हणजे, ही त्यांची तिसरी डॉक्टरेट आहे.

अभ्यासू नेतृत्व आणि कामाचा प्रचंड आवाका असलेल्या अशा लोकनेत्याला असा सन्मान मिळणे स्वाभाविकच आहे. देवेंद्रजी, तुमच्या शिरपेचात खोवल्या गेलेल्या या नवीन मानाच्या तुऱ्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.

कृषी क्षेत्रातील बदलासाठी कृषी विद्यापीठे, शासन यासोबतच कृषी पदवीधर यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतीमध्ये केमिकलचा वापर कमी केल्याने माती खराब होणार नाही. नैसर्गिकशेती ला पुढे नेणे आवश्यक आहे. कृषी तंत्रज्ञानावर आधारित उद्योग कसे वाढवता येतील यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या पदवीप्रदान समारंभात राज्यपाल वर्मा यांच्या हस्ते विविध विद्याशाखांतील एकूण ४ हजार ६०२ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये ४ हजार १८२ स्नातकांना पदवी, ३४६ स्नातकांना पदव्युत्तर पदवी तर ७४ स्नातकांना आचार्य (पीएच.डी.) पदवीने अनुग्रहित करण्यात आले. तसेच शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ४२ यशस्वी स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदके व रोख पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेचे (आयसीएआर) माजी संचालक डॉ. अशोक कुमार सिंह, कुलगुरू डॉ. विलास खर्चे व राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.