पुणे मेट्रो भवन केवळ एक इमारत नसून, पुण्याच्या आधुनिक आणि वेगवान प्रवासाचे केंद्र ठरेल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज अशा ‘पुणे मेट्रो भवन’चे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या सोहळ्याला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. पुणे मेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अत्यंत प्रभावीपणे हे काम पूर्ण केले आहे, त्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
पाटील यांनी म्हटले, हे मेट्रो भवन केवळ एक इमारत नसून, पुण्याच्या आधुनिक आणि वेगवान प्रवासाचे केंद्र ठरेल. पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर, प्रदूषणमुक्त आणि वेळेची बचत करणारा व्हावा, यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याचे पाटील म्हणाले.
पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळाली असून पुणेकरांनी मेट्रो सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सध्या दररोज सुमारे अडीच लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. भविष्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश असलेले जवळपास २०० किलोमीटरचे मेट्रो जाळे उभारण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वेगाने विकसित होणाऱ्या नागरी विकासाचा विचार करून पुणे मेट्रो आणि नगर विकास विभागाने या संपूर्ण नेटवर्कचे सविस्तर नियोजन तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीदेखील फडणवीस यांनी दिली.
या प्रसंगी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, हेमंत रासने, बापू पठारे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरुवातीला काही अडचणींमुळे उशिरा सुरू झाले असले तरी एकदा गती मिळाल्यानंतर अत्यंत वेगाने हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. देशातील सर्वाधिक गतिमानतेने पूर्ण होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांमध्ये पुणे मेट्रोचा उल्लेख केला जातो. मेट्रो स्थानकांचे आधुनिक डिझाइन, मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी, प्रवासी सुविधा तसेच अत्याधुनिक तांत्रिक प्रणाली या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे.
सध्या पुणे शहरात सुमारे 33 किलोमीटरचा मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला आहे. टाटा समूहाच्या सहकार्याने देशातील पहिल्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) असलेल्या 23 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्यात असून त्यापैकी 12 किलोमीटर मार्गाचे उद्घाटन मे महिन्यात, तर उर्वरित 11 किलोमीटर मार्ग जुलै महिन्यात सुरू करण्याचे नियोजन आहे. या दोन्ही प्रकल्पांसह पुण्यातील मेट्रोचे एकूण जाळे सुमारे 56 किलोमीटरपर्यंत पोहोचणार आहे. याशिवाय आणखी 55 किलोमीटरचे काम सुरू असून सुमारे 80 किलोमीटरचा विस्तार प्रस्तावित आहे. भविष्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश असलेले जवळपास 200 किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क उभारण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुण्याचा वेगाने होणारा नागरी विकास लक्षात घेता या संपूर्ण 200 किलोमीटर नेटवर्कचे सविस्तर नियोजन तातडीने पूर्ण करावे, सर्व मार्गांचे डीपीआर एकत्रितपणे तयार करावेत तसेच भविष्यातील ग्रोथ सेंटर्स, नवीन विमानतळ, औद्योगिक क्षेत्रे आणि वाढती उपनगरे यांचा विचार करून मेट्रोचे जाळे विकसित करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी महामेट्रो प्रशासनाला दिल्या. पुढील काळात जमिनीवर, आकाशात आणि भुयारी मार्गांद्वारे वाहतूक व्यवस्था विकसित करून पुणे शहर वाहतूक कोंडीरहित आणि शाश्वत शहर बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.