नायगाव बीडीडी चाळवासियांची स्वप्नपूर्ती… अनेक वर्षांपासून हक्काच्या घराची प्रतीक्षा करणाऱ्या कष्टकरी बांधवांना सन्मानाने जगण्याची नवी दिशा मिळाली – मंत्री चंद्रकांत पाटील

9

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुला’तील 864 पुनर्वसन सदनिकांचे वितरण पार पडले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 14 चाळवासियांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकांची चावी व ताबापत्राचे वाटप करण्यात आले. अनेक वर्षांपासून हक्काच्या घराची प्रतीक्षा करणाऱ्या कष्टकरी बांधवांना सन्मानाने जगण्याची नवी दिशा मिळाली असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. अनेक वर्षांपासून हक्काच्या घराची प्रतीक्षा करणाऱ्या कष्टकरी बांधवांना सन्मानाने जगण्याची नवी दिशा मिळाली आहे. विकास आणि लोककल्याण यांचा मेळ घालत, दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या आमच्या महायुती सरकारच्या कटिबद्धतेचे हे जिवंत उदाहरण आहे. सर्व लाभार्थी कुटुंबांचे पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकासाचा विषय जवळपास चार दशकांपासून प्रलंबित होता. त्यामुळे केवळ खासगी बिल्डरांवर अवलंबून न राहता शासनाने पुढाकार घेत हा प्रकल्प म्हाडामार्फत राबवण्याचा निर्णय घेतला. अनेक अडचणींवर मात करत हा प्रकल्प नियोजनबद्ध पद्धतीने साकार करण्यात आला. पहिल्या टप्प्यात वरळी येथील सदनिकांचे वितरण करण्यात आले असून, दुसऱ्या टप्प्यात आज नायगाव येथील सदनिकांचे वितरण होत आहे. पुनर्विकासाचे काम अधिक वेगाने पूर्ण करून 2029 पर्यंत बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील सर्व रहिवाशांना घरांच्या चाव्या देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच जागेच्या मर्यादेमुळे उद्भवणाऱ्या पार्किंगच्या प्रश्नावरही निश्चित तोडगा काढला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुंबईत सध्या जवळपास 1000 एकर क्षेत्रफळावर विविध पुनर्विकास प्रकल्प राबवले जात आहेत. मुंबईतील मध्यमवर्गीय नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे फडणवीस म्हणाले.

या कार्यक्रमास विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, मंत्री मंगल प्रभात लोढा , आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुंबईच्या महापौर रितू तावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.