राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमध्ये मेगा भरती; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पदभरती तात्काळ सुरू करण्याचे आदेश

11

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला आता वेग येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

महाविद्यालयनिहाय पदभरती मान्यतेसाठी पत्र देण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच, दीर्घकाळ प्रलंबित असलेली पदभरती प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत व संस्थांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही त्वरीत करण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या निर्णयामुळे राज्यातील हजारो पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून, महाविद्यालयांमधील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव अशोक मांडे, सहसचिव संतोष खोरगडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अजय भामरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.